Tuesday, September 29, 2020

सेंद्रिय शेती, सेंद्रिय खते

                    ● सेंद्रिय शेती, सेंद्रिय खते व फायदे ●

सेंद्रिय शेती. Organic Farming

हवा, माती, धान्याची रोपे, पशू, पक्षी, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे व निसर्गचक्रात समतोल राखणे, हा सेंद्रिय शेतीचा महत्वाचा उद्देश आहे. 

सेंद्रिय शेती करताना कोणत्याही रासायनिक गोष्टीचा वापर न झाल्यामुळे मनुष्याचे तसेच जमिनीचे आरोग्यास पोषक राहण्यास मदत होते.

सेंद्रिय शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रानुसार चालणारी अनुरूप शेती असल्यामुळे, जीवसृष्टीला कसलीही हानी न होता, सर्व प्रकारचे प्रदूषण होणे टाळता येते.


• प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते, त्याला सेंद्रिय खत असे म्हटले जाते.

Thinkingmindrj

• सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते खालील प्रमाणे:-


- शेणखत, 

- कंपोस्ट, 

- हिरवळीची खते, 

- गांडूळ खते, 

- माश्यांचे खत, 

- खाटिकखान्याचे खत, हाडांचे खत, 

- कोंबडी खत,

- लेंडी खत,

- तेलबियांची पेंड इत्यादी.


• शेणखत : 

- गाईचे / म्हशीचे शेण, मूत्र, तसेच गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हटले जाते.

- शेणखतामध्ये नत्र, स्फुरद व पालाश हे मुबलक प्रमाणात असते.

- शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते.


• कंपोस्ट खत :-

- शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीवजंतूंमुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश मुबलक प्रमाणात आढळते.


• हिरवळीची खते :- 

- हिरवळीचे खाते म्हणजे,  लवकर वाढणाऱ्या पिकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करून पीक फुलोऱ्यावर येण्याच्या आधी ते नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाढली जातात.

- त्यापासून जमिनीला नत्र मिळते, जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. या पद्धतीने तयार केलेल्या खतांना हिरवळीचे खते असे संबोधले जाते.

- या गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागू शकतो.

- यामध्ये ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी, बरसीम, ग्लीरिसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात चांगल्या प्रमाणात होतो.

- मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होताना दिसून येते.


• गांडूळ खत :- 

- ह्या खतात गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गांडुळाची अंडीपुंज, बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असतो, या खताला गांडूळ खत असे म्हणतात.


• माशाचे खत :- 

- समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ते. ह्यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण भरपूर असते.


• खाटीकखान्याचे खत :- 

- खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते. 

● सेंद्रिय शेतीचे फायदे.

• जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थांत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबडी खत, रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.

• मातीचा आरोग्य स्तर कायम ठेवण्यास मदत.

• शेतीवर अवलंबून असणार्‍या जीवांना, नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क हा सेंद्रिय शेतीमुळे मिळतो.

• सेंद्रिय शेतीमुळे अन्न सुरक्षेची खात्री व जीवनमान उंचावण्यास मदत होते.

• आर्थिक उत्पनात वाढ व खर्चात घट होते, त्यामुळे शेतीचे आर्थिक नियोजन हे योग्यरितीने होते.

• जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते.

• वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास, जमिनीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते.


• सेंद्रिय खतांमुळे झाडांना विविध अवस्थेत नैसर्गिक नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांद्वारे उत्तम प्रकारे शोषले जाते.

• जमिनीचा सामुचा समतोल राखला जातो.

• सेंद्रिय खतांच्या नियमित वापरामुळे, मातीवर नैसर्गिक आच्छादन तयार होते, त्याची सावली होऊन तापमान वाढत नाही.

• कर्ब किंवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने, जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो, व हे जिवाणू जमीनीतून अन्नद्रव्य झाडांना सहजतेने उपलब्ध करुन देतात.


• सेंद्रिय शेती करताना, वनस्पतींपासून विविध निविष्ठा तयार करून त्या किटनाशकाचा स्वरूपात वापरता येतात. तसेच हानिकारक कीटकांना शेतीपासून दूर ठेवण्यास मदत होते.

• निम तेल, गोमुत्र, करंज तेल, लसूण तेल इत्यादी घटकांपासून सौम्य ते तीव्र प्रकारचे किटनाशक तयार करता येऊ शकते.

• तसेच पक्षी थांबे,  चिकट सापळे, कामगंध सापळे,  प्रकाश सापळे वापरून होणार संभाव्य प्रादुर्भाव रासायनिक घटक न वापरता, टाळता येऊ शकतो.


धन्यवाद.

Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share


Monday, September 28, 2020

सेंद्रिय किटनाशक

                     ● सेंद्रिय किटनाशक ●

सेंद्रिय किटनाशक


पाने खाणारी, पाने गुंडाळणारी अळी, तसेच मावा यासाठी प्रभावी  सेंद्रिय किटनाशक.

शेवग्यावर पडणाऱ्या महत्वाच्या अळ्या म्हणजे पाने गुंडाळणारी व पाने खाणारी अळी होय.

या अळीच्या नियंत्रणासाठी विविध रासायनिक किटनाशक बाजारात उपलब्ध आहेत. या रासायनिक किटनाशकाच्या वापरामुळे खर्चात वाढ होतेच तसेच बऱ्याचवेळा यांचे प्रमाण जास्त झाल्यास पानगळ देखील होताना दिसून येते. अश्यावेळी सेंद्रिय पद्धतीने, घरच्याघरी तयार केलेले किटनाशक हा एक प्रभावी पर्याय ठरु शकतो. यामुळे खर्च कमी होतो, व झाडास इजा होत नाही, मधमाशी दूर जात नाही असे अनेक फायदे होतात.

पाने खाणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी यांच्यावर वेळेतच नियंत्रण मिळविणे गरजेचे असते, करण यामुळे झाडाच्या सर्वांगीण वाढीवर परिणाम होऊ शकतो. 

जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात त्यांना याची नक्कीच माहिती असेल, असे अनेक शेतकरी असतात जे सेंद्रिय व रासायनिक शेती म्हणजे मिश्र प्रकारची शेती करून वेळोवेळी शेतीत होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवतात. त्यांनी या किटनाशकाच्या शेतीत नक्कीच वापर करावा.

Thinkingmindrj

 ● या किटनाशकासाठी लागणारी सामग्री ●


• तंबाखू

• हिरवी मिरची

• लसूण

• निम अर्क

• गोमूत्र

• पाणी.


 ● वरील सामग्रीचे प्रमाण. ●


• तंबाखू - 250 ग्रॅम.

• हिरवी मिरची - 500 ग्रॅम.

• लसूण - 250 ग्रॅम.

 • नीम अर्क  - 200 मिली.

• गोमूत्र - 2 लिटर.

 • पाणी - 2 लिटर.


● सेंद्रिय किटनाशक बनविण्याची प्रक्रिया ●


- प्रथम 2 लिटर पाणी आणि 2 लिटर गोमूत्र एकत्रित करून, चांगले ढवळून घ्यावे. 

- त्यानंतर, हिरवी मिरची व लसूण  हे बारीक ठेचून घ्यावे. वरवंट्यावर किंवा मिक्सर याचा वापर केला तरी चालेल.

- यानंतर वरील पाणी आणि गोमूत्राच्या 4 लिटर मिश्रणापैकी 3 लिटर पाणी-गोमूत्र मिश्रण घेऊन त्यात हिरवी मिरची व लसूण याची पेस्ट टाकावी व हे सर्व शेगडीवर किंवा चुलीवर 10 मिनिटे चांगले उकळून घ्यावे. मिरची आणि लसणाचा अर्क या पाणी+ गोमूत्रामध्ये चांगला उतरू द्यावा. 

- यानंतर, उरलेले 1 लिटर, गोमूत्र+ पाणी मिश्रणात तंबाखू टाकून, हे मिश्रण देखील 10 मिनिटे चांगले उकळून घ्यावे.

- नंतर वरील दोन्ही मिश्रण थंड होऊ द्यावे. जेणेकरून यात टाकलेल्या घटकांचा चांगला अर्क उतरेल.

- वरील दोन्ही मिश्रण थंड झाल्यावर एकत्रित करून चांगले ढवळून घ्यावे.

- आता ह्या ढवळलेल्या मिश्रणात, 200 मिली. नीम अर्क टाकावे व पुन्हा हे सर्व मिश्रण चांगले ढवळून घ्यावे.

• वरील सर्व प्रक्रिया झाल्यावर आपले किटनाशक तयार होईल, हे अंदाजे 3 लिटर मिश्रण तयार होऊ शकते.


● सेंद्रिय किटनाशक वापरण्याची पद्धत ●

- वरील तयार केलेले सेंद्रिय किटनाशक हे फावरणीसाठीच वापरावे.

- सेंद्रिय किटनाशक 15 लिटरच्या टाकी साठी 150 मिली या प्रमाणात घ्यावे.

- याची फवारणी करताना तोंडाला रुमाल बांधावा, पूर्ण बाहीचा शर्ट घालावा, तसेच डोळ्यावर गॉगल लावावा.

- ही फवारणी शक्यतो संध्याकाळच्या वेळेस घ्यावी, जेणेकरून याचा चांगला परिणाम आपणास पहावयास मिळेल.

- शेवग्यामध्ये हे सेंद्रिय किटनाशक मावा, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, कोळी, लाल कोळी यावर प्रभावीपणे वापरता येते. तसेच अंडीनाशक म्हणून देखील या सेंद्रिय किटनाशकाच्या वापर करता येतो.


• हे किटनाशक तयार केल्यावर लागलीच वापरले असता उत्तम परिणाम दिसून येतो. 

• शेतीवरील खर्च कमी होतो, रासायनिक किटनाशकामुळे होणारे दुष्परिणाम होत नाहीत. हे किटनाशक पूर्णतः सेंद्रिय असल्यामुळे याचे कसलेच साईड इफेक्ट शेवगा झाडावर होत नाहीत.


धन्यवाद.

Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share


Tuesday, September 22, 2020

वर्मीवाॅश / गांढुळपाणी शेतीतील फायदे

 ● वर्मीवाॅश / गांढुळपाणी शेतीतील फायदे ● 

Wormiwash / गांढुळपाणी


सेंद्रिय शेवगा शेती मध्ये गांढुळ पाण्याचे विशेष महत्व आहे.

• गांडूळ च्या शरीरातून नेहमी एक स्त्राव स्रवत असतो. 

• या स्त्रावला " Coelomic Fluid " असे म्हणतात. " कोलॅमिक फ्लूड " नावाचा पिवळसर स्त्राव हा गांढुळासाठी वंगणाचे काम करत असतो.

• या स्त्रवामुळे गांडूळाच्या शाररिक हालचाली, श्वासोच्छ्वास व इतर प्रक्रिया सुलभ होतात. 


• कोलॅमिकच्या स्त्रावात बुरशीनाशक गुणधर्म तर  असतातच, याशिवाय

- नत्र-1.32%,

- स्फुरद-0.72%,

-पालाश-0.65% 

आणि नैसर्गिक सूक्ष्म अन्नद्रव्येसुद्धा असतात. 

गांडूळपाण्यात काही संप्रेरके देखील असल्याचे काही अभ्यासात दिसून आलेले आहे.

• गांडूळपाणी हे पिकांना फवारणीद्वारे किंवा जमिनीतून सुध्दा देता येते.

• व्हमीरवाॅशची फवारणी घेत असाल तर, दोन फवारणी मधील अंतर हे कमीतकमी 12 दिवसांचे ठेवावे. 

शेवग्यामध्ये व्हमीरवाॅशची फवारणी ही झाडाच्या वाढीच्या अवस्थेत, फुलोरा अवस्थेत तसेच फळधारणा अवस्थेत ही घेऊ शकता.म्हणजेच शेवगा बागेच्या सर्व अवस्थेमध्ये गांढुळपाणी वापरता येते, याच्या वापराचे कसलेही दुष्परिणाम शेवगा झाडावर होत नाहीत.

Thinkingmindrj

● गांढुळपाण्याचे शेवगा शेतीत होणारे फायदे खालीप्रमाणे.


• झाडावरील बुरशी नाहीशी होते.

• जमिनीतून दिल्यास, पांढ-या मुळ्यांची संख्या वाढवण्यास मदत करते.

• नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्मअन्नद्वव्ये नैसर उपलब्ध स्वरुपात व सूक्ष्म अन्नद्वव्ये उपलब्ध स्वरुपात असल्यामुळे झाडाची सर्वांगीण वाढ होण्यास मदत होते.

• नवीन फुटवे फुटण्यास तसेच जास्त कळी निघण्यास मदत होते.

• पानांचा रंग हिरवा राखून, पानगळ कमी करण्यास मदत करते.

• फळधारणा अवस्थेत गांढुळपाण्याची फवारणी नियमित घेत राहिल्यास, शेंगावरील बुरशी नाहीशी होते, शेंगांचा रंग हिरवागार होतो, तसेच शेंगावरील तंबूसपणा नाहीसा होतो.

• परिणामी उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होते, शेंगांची प्रत सुधारते.

• झाड निरोगी राहते, मुळांची अन्नद्रव्ये शोषण्याची क्षमता वाढते.

• त्यामुळे, गांढुळ खतासोबतच, गांढुळ पाण्याचाही वापर हा सातत्याने करावा, जेणेकरून खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होईल. 

• शेतकरी शेतातच गांढुळपाणी तयार करू शकतात, गांढुळ पालनासाठी बेड मिळतात, त्यात छोट्या प्रमाणावर गांढुळखत व गांढुळपाणी अत्यल्प खर्चात तयार करता येऊ शकते.


गांढुळपाणी वापरण्याचे प्रमाण


• प्रति एकर जमिनीतून देण्यासाठी..

200 लिटर पाण्यात - 50 लिटर गांढुळपाणी.

• फवारणी साठी..

• 15 लिटर पंपाला - 100 मिली गांढुळपाणी.


• गांढुळपाण्याच्या नेहमीच्या वापराने, रासायनिक खतांचा वापर कमी होतो, झाडे निरोगी राहतात, खर्च कमी होती, परिणामी उत्पन्नात वाढ होते.


धन्यवाद.

Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share

Saturday, September 19, 2020

फळमाशी व उपाययोजना

 ● फळमाशी व उपाययोजना. ●

फळमाशी


शेवगा शेंगांवरिल फळमाशी ही, शेंगांचे जवळपास 60 ते 70 टक्क्यांपर्यंत नुकसान करण्याची क्षमता असलेली किड.

• फलमशीच्या प्रादुर्भावामुळे शेंगा बाद होतात, शेंगा वाकड्या होतात, तसेच शेंगातून चिकट फेस येतो. अश्या शेंगा बाजारात नेता येत नाहीत.

• फळमाशीने डंख मारलेल्या ठिकाणचा भाग हा तपकिरी रंगाचा, कुजल्यासारखा दिसतो, व त्यातून बऱ्याच वेळा चिकट द्रव स्त्रावताना दिसते.

• फळमाशी शक्यतो पावसाळ्यात व हिवाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते.

• फलमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात एकरी कमीतकमी 2 प्रकाश सापळे लावलेत. 

• शेतात मक्षिगंध सापळे देखील लावले जातात, पण काही ठिकाणे मक्षिगंध सापळे लावले असता, फळमाशी जास्त प्रमाणात आलेली दिसून आली आहे. मक्षिगंध सापळे हे शेतकऱ्याने त्यांचा मागील अनुभवानुसार लावावेत.

• फळमाशी येऊ नये म्हणून वारंवार निम तेलाची फवारणी घेत राहावी, जेणेकरून फळमाशी येणार नाही, तसेच इतर अळ्या, जसे पाने गुंडाळणारी आळी, पाने खाणारी आळी यांनाची दूर ठेवण्यास मदत होईल.

• एकदा फळमाशी आली की ती शेंगांचे नुकसान करते, व नंतर उपाययोजना केली जाते, पण तोपर्यंत बरेच नुकसान झालेले असते. त्यामुळे प्रतिबंधनात्मक उपाययोजना करणे चातुर्याचे ठरते.

• प्रकाश सापळे, मक्षिगंध सापळे व निम तेलाची किंवा निम अर्काची फवारणी ही प्रतिबंधनात्मक उपाय योजनेत वापरावे. पण जर फळमाशीचा प्रादुर्भाव शेवगा शेतात दिसत असेल तर, फळमाशीच्या नियंत्रणासाठी खलील उपाययोजना कराव्यात.


फळमाशीच्या नियंत्रणासाठी रासायनिक उपययोजना


 •  स्पिनोसॅड - ०.२ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.

किंवा,

• डायक्लोरोव्हॉस-  ०.५ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.

किंवा,

• मिथोमिल - १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.

किंवा,

• थायमॅथॉक्झाम - ०.२ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.

किंवा,

• इमामेक्टिन बेन्झोएट - ०.२५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.

किंवा,

• डेल्टामेथ्रीन - ०.५ मिली  प्रति लिटर पाण्यातून फवारणी घेता येते.



धन्यवाद.


Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share

Friday, September 18, 2020

पावसाळ्यातील शेवग्याची काळजी

 ● पावसाळ्यातील शेवग्याची काळजी


शेवगा लागवड करताना, पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करणे आवश्यक आहे.शेवगा पिकाला कमी पाणी असले तरी चालते, पण जास्त पाणी नको.

शेवगा शेती काळजी

• शेवगा झाडाची मूळे ही इतर झाडाच्या तुलनेत अत्यंत नाजूक असून, जास्त काळ पाणी मुळाजवळ राहिल्यात मूळे कुजतात, तसेच त्यांचे अन्नद्रवे शोषण्याच्या क्षमतेवर परिमाण होतो.

• पाणी धरून ठेवणारी जमीन, तसेच ज्या रानात पावसाळ्यात जास्त दिवस पाणी साचून राहते व पाणी बाहेर काढून देण्याचा काहीच पर्याय उपलब्ध नसतो, अश्या जमिनीत शक्यतो शेवगा लागवड करू नये.

• सतत धार पाऊस असल्यास किंवा रोज पाऊस पडत राहिल्यास, शेवग्याच्या मुळांजवळ बरेच दिवस ओलावा राहतो, अश्या अवस्थेत मुळांना बुरशी लागते, मूळकूज होते.

• मुळांना बुरशी लागल्यामुळे, पाने पिवळी पडणे तसेच पानगळ व फुलगळ होणे, असे प्रकार पहावयास मिळतात.

• मूळकूज जर जास्त प्रमाणात असेल तर झाडे सुकून जाऊन दगावू शकतात, अश्या अवस्थेत तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे ठरते.

ThinkingmindRJ

• सुरवातीला महाराष्ट्रात झालेली शेवगा लागवड ही दुष्काळी जिल्यात झालेली आहे व तेथे उत्पन्न देखील चांगले घेण्यात आलेले उदाहरणे आहेत.

• जास्त पर्जन्यमान असलेल्या जिल्ह्यात शेवगा शेतकरी मित्रांना तारेवरची कसरत करावी लागते, कारण आज हिरवा दिसणारा शेवगा प्लॉट , जास्त पावसामुळे उद्या पिवळा दिसू शकतो.

• पावसाळ्यात किंवा पावसाच्या अगोदर शक्यतो पंजा छाटणी करून घ्यावी, जेणेकरून पावसाच्या महिन्यात फुटवे फुटून त्यांचे फांदीत रूपांतर होईपर्यंत पावसाचा कालावधी निघून जातो. आणि नंतर फुलधारणा होऊन उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने नियोजन करता येते.

• पावसाळ्यात सर्वात जास्त होणारा प्रादुर्भाव म्हणजे बुरशीलागण होय.

• पावसाळ्यात बुरशी सोबतच, फळमाशी, मावा, खोडकीडा, हुमणी, पाने गुंडाळणारी तसेच पाने खाणारी आळी इत्यादी प्रादुर्भाव होताना दिसून येतात.


 ● पावसाळ्यात काय काळजी घ्यावी

• पावसाळ्यात सर्वात अगोदर घ्यावयाची काळजी म्हणजे शेतात पाणी जास्त काळ थांबू न देणे, म्हणजेच शेतात पाणी साचून राहत असेल तर ते बाहेर काढण्याची व्यवस्था करणे.

• पावसाळा चालू होण्याअगोदर बांधावरील लिंबाच्या झाडावर कीटकनाशकाची फवारणी करणे, जेणेकरून हुमणीचे नियंत्रण पतंग अवस्थेत करता येऊ शकते.

• पतंग अवस्थेतील कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी एकरी किमान 2 प्रकाश सापळे लावावेत.

शेवगा झाडाच्या खोडाजवळील तण काढून घ्यावे, जेणेकरून खोडकिड्याचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊ शकतो.

• खोडाजवळ मातीचा भर द्यावा, झाडे लहान असतील तर वादळ पावसात झाडे कोलमडू शकतात.

• पावसाळा चालू झाल्यानंतर आठवड्यातून एकदा तरी बुरशीनाशक व हुमिक ऍसिड ड्रीपद्वारे द्यावे किंवा आळवणी करावी.

• तसेच स्पर्षजन्य बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी.

• जास्त पाऊस झाल्यामुळे मुख्य अन्नद्रव्ये व सुष्म अन्नद्रव्ये पाण्यासोबत खाली निघून जातात, त्यामुळे मुळांजवळ त्यांची कमतरता जाणवून, परिणामी झाडाची वाढ खुंटुन पाने पिवळी पडतात व गळून जातात.

• अश्या अवस्थेत, पाऊस काही दिवस जर थांबला असेल, तर सुष्मअन्नद्रव्ये (Micronutrients) व मुख्यअन्नद्रव्ये (NPK) ड्रीप द्वारे द्यावीत.

• नवीन लागवड असेल तर अश्या अवस्थेत झाडे जगविण्याकडे कल असावा. पाऊस थांबल्यानंतर झाडांची नैसर्गिक वाढ होत असते.

• पावसाळ्यात बरेच शेतकरी ड्रीपद्वारे आठवड्यातून एकदा, गोमुत्र , गूळ, गांढुळपाणी देतात, व याचा परिणाम देखील चांगला दिसून आलेला आहे.

• अधिक माहिती साठी ThinkingmindRJ या शेवगा शेतीवरील youtube channel ला भेट द्यावी.


धन्यवाद.

Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share

Wednesday, September 16, 2020

शेवगा सेटिंग आणि मधमाशी.

              ● शेवगा सेटिंग आणि मधमाशी●

      🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝


सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टीन यांचे एक महत्वाचे वाक्य म्हणजे..

" ज्या वेळी मधमाशी या जगातून संपेल, त्या नंतर अवघ्या चार वर्षानंतर, मनुष्य जातीचे अस्तित्वच संपुष्टात येईल."

शेवगा आणि मधमाशी


• मधमाशीमुळे होणाऱ्या परागीभवणातून फळधारणा तर होतेच, याशिवाय फळाची प्रत ही सुधारते, तसेच फुलगळ होण्याचे प्रमाण कमी होते.

• पुष्प वनस्पतींना मधमाशीचा होणारा स्पर्श हा परिस स्पर्शापेक्षा कमी नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

• यामुळेच मधमाशीला सामाजिक कीटक असे देखील म्हटले जाते. 

• मधमाशी अतिशय महत्वाचे काम करत असते, चिकाटी वृत्तीचा धडा मधमाशीपासून मानवाने घ्यावयास हवा. तसेच समूह काम म्हणजेच टीम वर्क, याचाही मधमाशी एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

• न थकता, अविरत श्रम करून मधासारखा अविनाशी पदार्थ निर्माण करत असते.

• पराग सिंचनामुळे शेती उत्पादनात वाढ होत असतेच, तसेच मध व मेण हे नैसर्गिक पदार्थ देखील मानवास उपलब्ध मधमाशी मुळे उपलब्ध होतात.

शेवगा शेतीत मधमाशीचे खूप महत्व आहे. शेवग्याच्या फुलांचा देठ हा नाजूक असल्याकारणाने ही फुले लवकर गळतात. पाऊस किंवा वादळात शेवग्याची असंख्य फुले गळताना दिसतात.

• अशी फुलगळ होण्याअगोदर जर या फुलांची सेटिंग झाली, म्हणजेच नर व मादी परागकणांचे मिलन होऊन शेंग निर्मिती झाली तर होणारे संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते.

• शेवग्याच्या फुलांचा रंग व गंध हा मधमाश्यांना लांबून आकर्षित करत असतो, फुले ही झुपक्याने लागत असल्यामुळे ती दुरूनच दिसतात.

• पाळीव किंवा जंगली मधमाश्या, तात्काळ शेवगा फुलांकडे आकर्षित होताना दिसून येतात.

• मधमाश्यांच्या उपस्थितीत शेंगधारणा ही जास्त प्रमाणात होते.

शेवगा उत्पादनात सुमारे २५ ते ३५% एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ होते.

Thinkingmindrj

मधमाश्यांच्या प्रजाती खलील काही प्रजाती आहेत,

- भारतीय माशी (ॲपिस सेरेना इंडिका)

- युरोपियन माशी (ॲपिस मेलिपेरा)

- आग्या माशी (ॲपिस डॉरसेटा)

- लहान माशी (ॲपिस फ्लोरिआ)

वरील मधमाश्यांपैकी 'भारतीय माशी' आणि 'युरोपियन माशी' पेटीत पाळता येतात.


• भारतीय माशी' आणि 'युरोपियन माशी' यांचे मधमाशी पालन करून रोजगार निर्मिती करता येते.

शेवगा शेतीला जोडधंदा म्हणुन मधमाशी पालन हा एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो, यात शंका नाही.


मधमाशीपालनाचे मानवास होणारे फायदे


• अनेक पिकामध्ये मधमाश्यांद्वारे परागीकरण झाल्यामुळे उत्पादन वाढते.

• मध तर मिळतेच, सोबतच मेणाचेही उत्पादन मिळते. विविध सौंदर्यप्रसाधने, अनेक प्रकारची औषधे तयार करण्यासाठी मध आणि मेणाचा उपयोग केला जातो.

• मधमाशीपालन शेती, फळबाग, भाजीपाला लागवड व कोणत्याही पूरक उद्योगाशी स्पर्धा करत नाही.

• नैसर्गिक परागीभवणासाठी मधमाशी पेटी भाड्याने किंवा विकत देली जाते.

• पर्यावर्णकचे संतुलन राखल्याने समाधान मिळते. पौष्टिक अन्न खावयास मिळते.

• मधमाशी पालनासाठी आवश्यक तंत्रांचे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. याच्या ट्रेनिंग महाराष्ट्रात विविध ठिकाणी होत असतात. प्रशिक्षण घेऊनच मधमाशी पालनाचा व्यवसाय करावा.


● मधमाशी वाचवणे आपले कर्तव्य आहे.●


• विषारी कीटक नाशकांच्या फवारण्या करू नये अथवा अपरिहार्यता असेल, तर अश्या फवारण्या संध्याकाळी कराव्यात.

• शेतातील अथवा बांधावरील, मधाची पोळी जाळून अथवा धूर देऊन काढू नये.

• मधमाशांनाउपयुक्त अश्या सपुष्प वनस्पतींची लागवड करणे. उदा. झेंडू इत्यादी.

• शेताच्या आजूबाजूला, मधमाश्यांची पोळे येण्यासाठी, मधमाशयांची अमिशांचा वापर जास्तीतजास्त करावा.


• परागीभवनामुळे लाभ होणाऱ्या भाज्या, फळे आणि फुले खालीलप्रमाणे,

• भाज्या - शेवगा, कांदा, कोबी, मुळा, दोडका, कारली, काकडी, भोपळा, गाजर इ.

• फळे - डाळिंब, संत्री, पेरू, स्ट्राँबेरी, काजू, नारळ, लिंबू इ.

• फुले - शेवंती, झेंडू, गलांडी,  इ.

• पिके - मोहरी, सूर्यफूल, बाजरी इ.


● पूर्ण मानव जातीवर, मधमाशीचे मोठे उपकार आहेत. मधा सारखे अमृत निर्माण करणाऱ्या या किटकाचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. मधासाठी पोळी जाळणे,विषारी कीटक नाशके फवारणे, मोबाईल टोवर उभारणे,मधमाश्या विषयी असलेले अज्ञान पसरवणे, या सर्व कारणांमुळे एक उपयुक्त जीव संपण्याच्या मार्गावर आहे.यासाठी आपण सर्वाने मधमाशीचे संरक्षण करणे गरजेचे झाले आहे.


धन्यवाद.

Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share

Tuesday, September 15, 2020

शेवगा लागवड अंतर

                     ●शेवगा लागवड अंतर.

शेवगा लागवड


शेवगा लागवड करताना काही महत्वाच्या बाबींमध्ये शेवगा लागवडीचे योग्य अंतर ठरवणे महत्वाचे असते.

• शेवगा लागवडीचे अंतर ठरवताना खलील बाबी विचारात घेणे गरजेचे ठरते.

- शेवगा लागवडीचे क्षेत्र.

- जमीन ( भारी/मध्यम/हलकी इत्यादी)

- आपल्याकडील पर्जन्यमान.

- आंतरपिके घेणे / न घेणे.

- इत्यादी बाबी विचारात घेऊन शेवगा लागवडीचे उत्तम अंतर ठरवता येते.

शेवगा झाडाच्या मुळांचा विस्तार इतर मोठ्या झाडांप्रमाणे जरी नसला, तरी संयुक्त मुळ्या ह्या जास्त प्रमाणात आजूबाजूला पसरलेल्या असतात.

• एक मजबूत सोटमुळ सरळ खाली जाते व त्यास अनेक उपमुळ्या/ संयुक्त मुळांचे जाळे तयार होते.

• ह्या संयुक्त मुळांचे जाळे हे झाडाच्या घेरानुसार कॅनोपीनुसार आजूबाजूला विस्तारलेले असते.

• त्यामुळे जमिनीचे भौतिक गुणधर्मानुसार लागवडीचे अंतर ठरवावे, जेणेकरून पुढील 8 ते 10 वर्षे शेवग्याचे व्यावसायिक उत्पन्न घेण्यास कसलीही अडचण येऊ नये.

• महाराष्ट्रामध्ये विविध अंतरावर शेवग्याची लागवड करण्यात येते, तसेच त्यात विविध आंतरपिके देखील घेतली जातात. अंतरपिकांबद्दल आपण पुढील लेखात बोलूयात.


शेवगा लागवडीचे विविध अंतरे खालीलप्रमाणे.


• 12 × 6

• 12 × 5

• 10 × 6

• 10 × 5

• 8 × 6

• 8 × 5

• 8 × 8

• 10 × 10

• 12 × 10

• 8 × 6 + 1

• 10 × 6 + 1

• 12 × 6 + 1

इत्यादी नानाविविध अंतरावर, महाराष्ट्रात शेवग्याची लागवड पहावयास मिळते.

As a Thinkinhmind team आम्ही खलील दोन लागवडीचे अंतरे घेण्याचा सल्ला देत असतो.


• 12 × 6 + 1

• 10 × 6 + 1

• वरील दोन अंतरानुसार त्याच लागवडीच्या क्षेत्रात जवळपास दुप्पट झाले बसतात व उत्पन्नात देखील वाढ होते, असे अनेक शेवगा शेतकऱ्याचे अनुभव आहेत.


• 12 × 6 + 1 अंतर म्हणजे, 

दोन ओळींमधील अंतर हे 12 फूट.

दोन झाडांमधील अंतर हे 6 फूट.

आता या 6 फुटवरील झाडापासून 1 फुटावर दुसरे झाड लावावे, असे प्रत्येक 6 फुटवरील झाडानंतर 1 फुटावर दुसरे झाड लावावे.जेणेकरून झाडांची संख्या दुप्पट होते.

• अशी लागवड करताना शेतकऱ्याच्या मनात हा प्रश्न येणे स्वाभाविक आहे, की एक फुटावर दोन झाडे लावली तर त्यांच्यात स्पर्धा होऊन झाडांच्या वाढीवर परिणाम होणार नाही का?

• एक फुटावर वरील पद्धतीने लागवड केल्यास, झाडांच्या वाढीवर परिणाम झालेला दिसून आला आहे, पण तो फक्त 8 ते 12 टक्के आहे. बाकीचे, म्हणजे जवळपास 90 टक्के, दोन्ही झाडे योग्यरीत्या वाढलेले दिसून आलेले आहेत.

• ज्याठिकाणी असे दिसून येईल की, एक झाड नीट वाढलेले आहे व दुसऱ्या झाडाची वाढ खुंटलेली आहे, अश्या ठिकाणी लहान झाड काढून टाकावे.

• मोसंबी, चिकू, आंबा, काजू, मिलियाडूबिया, पेरू,  सीताफळ इत्यादी पिकामध्ये जर शेवगा लागवड करणार असाल तर, वरील झाडांच्या दोन ओळींमध्ये मध्यभागी शेवग्याची ओळ घ्यावी, व दोन्ही पिकांची ड्रीप व्यवस्था वेगवेगळी असावी.


अधिक माहितीसाठी खलील व्हिडीओ पाहू शकता.


धन्यवाद.

Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share


Thursday, September 10, 2020

शेवगा मुळे - झाडाचे आरोग्य

                     ●शेवगा मुळे - झाडाचे आरोग्य.●

शेवगा शेती माहिती


शेवगा झाड हे शेंड्यापासून ते मुळांपर्यंत नाजूक असते. त्यामुळे वातावरणातील बदलांना ते लगेच विविध प्रकारे प्रतिक्रिया देत असतात.


• शेवगा झाडाचा, फांद्यांचा विस्तार, फुले लागणे, शेंगधारणा व शेंगांचा विकास या महत्वाच्या गोष्टी ह्या झाडाच्या मुळांच्या आरोग्यावर अवलंबून असतात यात शंका नाही. यामुळे मुळांना निरोगी राखणे तसेच त्यांना निरोगी राखण्यासाठी लागणारे घटक त्यांच्यापर्यंत वेळोवेळी पोहचवणे हे गरजेचे ठरते.

• मानवांप्रमाणेच शेवगा झाडांनाही विकासासाठी व विस्तारासाठी, पाणी, खाद्य,  व विविध पौष्टिक पदार्थांची आवश्यकता असते.

• शेवग्याचे झाडाचा जमिनीच्या वर होणारा विकास पाहून त्याच्या मुळांचे आरोग्य समजणे सोपे ठरते.

Thinkingmindrj

शेवगा झाडाचे, प्रथमतः एक मुख्य मूळ वाढते, यास सोटमुळ म्हटले जाते. हे मूळ जमिनीत खोलवर जाऊन पोषकद्रव्ये घेण्यास सूरवात करते.

• त्यानंतर आजूबाजूकडील मुळे तयार होतात,  व जमिनीत सर्वत्र पसरतात, ही मुळे जास्तीत जास्त तयार होणे गरजेचे असते. या मुळांस संयुक्त मुळे म्हटले जाते, तसेच पांढऱ्या मुळी देखील संबोधले जाते.

• मातीमधून पाणी आणि पोषकद्रव्ये काढण्यासाठी वापरले जातात. पाणी व विविध अन्नद्रव्ये शोषून घेण्याचे काम, विशेषतः पांढरी मुळे करीत असतात.

• पांढरी मुळे ही निरोगी मुळे असतात व त्यांना बाजूकडील मुळे सर्वात जास्त असतात.

• पांढऱ्या मुळांची संख्या वाढल्याने रोपे निरोगी व एकसारखी दिसतात.

• जेव्हा शेवगा बी लावले जाते, काही दिवसांनंतर ते उगवल्यावर, रोप हे, मुळे तयार करण्यास सुरुवात करते. नवीन तयार झालेले रोप, ह्या मुळांत  सर्वाधिक प्रमाणात ऊर्जेची गुंतवणूक करतात.

• शेवगा झाडाच्या, मुळांच्या विकासावर सिंचनाचा मोठा परिणाम होत असतो.

•शेवग्यामध्ये जास्तीचे पाणी मुळासाठी हानीकारक असते व ते बुरशीच्या प्रति जास्त संवेदनशील असतात.बुरशी ही ओलसर वातावरणात लवकर पसरते. 

• मुळांच्या जवळ पाणी जास्त झाल्यास किंवा पाणी किंवा ओलावा जास्त दिवस राहिल्यास, झाडाची पाने पिवळी पडतात, व गळून जातात. झाडाची वाढ खुंटते.

• तसेच मुळांना बुरशी लागून मुळे तपकिरी रंगाची होतात, बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर मूळकूज होऊन झाड वाळू शकते.

• त्यामुळे  शेवगा शेती करताना ,मुळांना योग्य प्रमाणात पाणी देणे व पाण्याचा निचरा होणे हे अत्यंत आवश्यक असते.

• मुळांच्या वाढीसाठी हवेची गरज ही तितकीच महत्वाची ठरते.

• झाडाच्या मुळांच्या आजूबाजूची जमीन भुसभुशीत करून घेणे आवश्यक ठरते, त्या द्वारे हवेचे आवश्यक असलेले प्रमाण मुळांना लाभू शकते.

• पावसाळ्यात शेवगा झाडास आठवड्यातून एकदा तरी बुरशीनाशक व हुमिक ऍसिड देणे गरजेचे आहे. जेणेकरून बुरशीजन्य रोग हे मुळांपासून दूर ठेवता येऊ शकतात.

• पावसाळ्यात, मुळांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते.

• शेवग्यात जास्त प्रमाणात होणारी फुलगळ ही अधिक पाण्यामुळे होताना दिसून येते, त्यामुळे फुलोरा अवस्थेत पाणी नियोजन हे काटेकोरपणे गरजेचे आहे. 

• फुलोरा अवस्थेत पाणी कमी देणेच फायद्याचे ठरते. शेवग्यामध्ये पाण्याचे नियोजन की एक कलाच आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

• त्यामुळे पाण्याचा निचरा होणारी जमीन ही शेवग्यास जास्त मानवते. सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून मुळांची वाढ व आरोग्य हे चांगले राखून जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल.

• जमिनीत जास्त पाणी साचू देऊ नये. बुरशी नाशक व हुमिक ऍसिड चा वापर हा सातत्याने करावा. शेणखत, गांढुळळखत, लेंडीखातांचा वापर जास्तीत जास्त करावा.

• तसेच जीवामृत किंवा वेस्टडिकम्पोजरचा वापर ही सातत्याने करावा, जेणेकरून जमिनीचे आरोग्य सुस्तीतीत राहून, मुळांचेही आरोग्य उत्तम राहील.


धन्यवाद.

Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share

Wednesday, September 9, 2020

बातमी खरी - फोटो खोटा .

बातमी खरी - फोटो खोटा .


कोथिंबीर उत्पन्न


 • चार एकरामध्ये कोथिंबिरीसारख्या पिकातून साडेबारा लाखांचे उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्याची सध्या फेसबुक, व्हाट्सअप्प इत्यादी सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे. 


•  गाव- नांदुरशिंगोटे, ता. सिन्नर, जि. नाशिक या गावातील शेतकरी विनायक हेमाडे यांच्या कोथिंबिरीची नुकतीच साडेबारा लाखांमध्ये विक्री झाली होती.


• चार एकर कोथिंबिरीतून साडेबारा लाखांचे उत्पन्न मिळवणाऱ्या, श्री.विनायक हेमाडे या शेतकऱ्याच्या नावे वेगळाच फोटो व्हायरल होत आहे.


• डोक्यावर पैशांचे गाठोडे घेऊन जातानाचा तो फोटो विनायक हेमाडे यांचा नाही.


• फोटो जर नीट बारकाईने पाहिल्यास असेही लक्षात येते की, गाठोड्यातील नोटा या जुन्या आहेत.


• श्री. विनायक हेमाडे यांनी केलेले काम हे कौतुकास्पद आहे यात शंका नाही.

त्यांनी दाखवलेली दूरदृष्टी व शेताचे केलेलं नियोजन व मेहनत यामुळेच त्यांना हे यश मिळालेले आहे हे सत्य आहे.


• कुणीतरी चुकीच्या संदर्भातील फोटो त्या viral पोस्ट मध्ये टाकलेला आहे. बातमी खरी आहे, पण फोटो चुकीचा आहे.



धन्यवाद.

शेवग्याच्या बियांचे तेल.

                      ● शेवग्याच्या बियांचे तेल ●

Ben oil. शेवगा शेती माहिती

Thinkingmindrj 

शेवगा झाडास Miracle tree संबोधले जाते.

शेवग्याच्या पानांपासून ते मुळापर्यंत सर्वच भाग हे औषधी गुणधर्मयुक्त आहेत. 

• शेवग्याचा पाला,शेंग, बी,डिंक,साल,मुळे सर्वच भाग हे आयुर्वेदिक औषधी मध्ये वापरण्यात येतात.

• शेवग्याच्या बियांपासून तेल तयार करण्यात येते त्यास ' बेन ऑईल ' म्हणून ओळखले जाते.


• या तेलाचा वापर हा सौंदर्य प्रसाधनामध्ये केला जातो.

• तसेच हे तेल त्वचा रोगासाठी मलम तयार करण्यासाठी देखील वापरात येते.

• शरीराच्या मसाजसाठी देखील बेन ऑईलचा वापर होतो.

• मृदू वंगण म्हणून याचा वापर हा सुष्म यंत्रामध्ये केला जातो, उदा. घड्याळे.

• सर्व वातावरणात स्थिरता आणि अन्य तेलाप्रमाणे अधिक काळ ठेवल्यास वास न येण्याचा गुणधर्मामुळे यास विमानातील एंजिनाच्या विविध भागामध्ये या तेलाचा वापर करण्यात येतो.

• सुगंधी द्रव्ये उद्योगामध्ये बेन ऑईल चा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ( अत्तरे , केसांसाठी सुगंधी तेलाच्या निर्मितीसाठी ) 


• चांगल्या वाळलेल्या बीयांमध्ये तेलाचे प्रमाणे 18 ते ४२ टक्क्यांपर्यंत असू शकते.

• बियांवर दाव टाकून त्यापासून तेल मिळवता येते.

• शेवग्याच्या बियांच्या तेलाचा रंग आकर्षक पिवळा असा असतो.

• हे तेल किंचित चिकट असल्याने अत्यंत नाजूक अशा यंत्रातील ( उदा . घड्याळे ) घर्षण कमी करण्यासाठी वंगण म्हणून वापरण्यात येते .

शेवगा खाद्य तेलामध्ये मेदाम्लाचे प्रमाण हे, 0.5 ते 3 टक्क्यांपर्यंत कमी अधिक होते.

• आयुर्वेदानुसार, हे तेल मेंदू कर्करोग,अँटी पायरेटिक, पोषक घटकांनी परिपूर्ण, जिवाणूरोधक, बुरशीरोधक, दाह कमी करणारे व कोलेस्टेरॉलचे प्राण कमी करणारे असल्याचे सांगितलेले आहे.

• दक्षिण आशियाई देशात याचा वापर औषधामध्ये अधिक प्रमाणात केला जातो.


• तेल काढण्याच्या दोन प्रक्रिया आहेत. त्यातील कोल्ड प्रेस ही शेवगा बियांपासून तेल काढण्यासाठी ही सोपी पद्धती मानली जाते.

• बीयांवरील टणक कवच हे माणसांच्या साहाय्याने काढले जाते, किंवा यासाठी विद्युत ऊर्जेवर चालणारे यंत्र देखील उपलब्ध आहे. 

• बीयावरील आवरण काढल्यानंतर ताज्या स्थितीमध्ये म्हणजेच त्वरित तेल काढावे. 

• आवरण काढल्यानंतर अधिक काळ गेल्यास, काढलेल्या तेलाचा रंग हा गडद होतो.

• सुरवातीला काही मिनिटांसाठी यंत्र सुरू करून , त्यानंतर त्यामध्ये आवरण काढलेल्या बिया टाकाव्यात.

• काही मिनिटांमध्ये बियातून तेल येऊ लागते. •दुसऱ्या बाजूने बीयांचीपेंड बाहेर येते.

• कोल्ड प्रेस पद्धतीने काढलेल्या शुद्ध तेलाचा रंग हा सोनेरी पिवळा असतो.

• हे तेल दोन ते तीन दिवसांसाठी स्थिर ठेवावे लागते, यामुळे त्यातील तरंगते कण खाली बसण्यास मदत होते. याला सेडिमेंटेशन म्हणतात.

• तयार झालेले तेल बॉटल मध्ये भरण्यापूर्वी सेडिमेटेशन न केल्यास, त्यात पाण्याचा अंश राहू शकतो, व त्यामुळे तेलाची स्थिरता आणि गुणधर्म यावर परिणाम होतो. 



• एक किलो शेवगा बियांपासून 300 ते 400 ग्रॅम तेल मिळते.

• बिया जर तपकिरी होईपर्यंत भाजून घेतल्या, तर त्यातून तेलाचे प्रमाण वाढते. 

• स्थिर झालेल्या तेल अलगद वरच्यावर ( खालील थर न हलवता ) स्वच्छ भांड्यात काढून घ्यावे . अत्यंत बारीक चाळणीच्या साह्याने गाळून घ्यावे.

• हे गाळलेले तेल, नंतर शक्यतो काचेच्या बाटलीत भरून ठेवावे.


• भारतामध्ये जे तेल तयार केले जाते, हे शक्यतो निर्यातीसाठी तयार केले जाते.

• गुजराथ, तामिळनाडू, कर्नाटक , तेलंगणा, या राज्यातून हे तेल मोठ्या प्रमाणात निर्यात होते.



धन्यवाद.


Team ThinkingMindRJ

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w


Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share

Saturday, September 5, 2020

निंबोळी अर्क - शेवगा शेती

 ● निंबोळी अर्क - शेवगा शेती ● 

निम अर्क.


• शेवग्याच्या झाडावर होणाऱ्या विविध अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यास निंबोळी अर्क कामी पडतो.

• कडूलिंबाचे झाड हे आपल्याकडे सर्वत्र आढळून येते. या झाडाचे पान, फळ, डिंक, साल, मूळ यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. 

• कडूलिंबाच्या पानांचा रस आणि गोमुत्र एकत्र करून विविध प्रकारच्या अळ्याच्या प्रादुर्भाव आटोक्यात आणता येऊ शकतो, या संदर्भातील व्हिडीओ आपल्या Youtube channel - ThinkingMindRJ उपलब्ध आहे.

• कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले 'ॲझाडिराक्टीन' हा घटक कीटकनाशकाचे काम करते. म्हणून निंबोळी अर्क हे एक उत्कृष्ठ किड प्रतिरोधकाचे काम करते.

• निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंब या झाडाच्या बियांपासून (निंबोळ्या / निंबोण्या) काढलेला अर्क असतो. 

• 'ॲझाडिराक्टीन' या घटकाचे प्रमाण हे, निंबोणीच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते.

• निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा शेवगा व तसेच इतर पिकांवरील बऱ्याच किडींवर परिणामकारक आहे.

• शेवगा झाडावर पडणारे रोग काही रोग महणजे.. मावा, पाने गुंडाळणारी आळी, पाने खाणारी आळी, तुडतुडे, खोडकिडा इत्यादींवर निंबोळी अर्क प्रभावशाली ठरतो.

• इतर पिकावरील काही प्रादुर्भाव म्हणजेच, अमेरिकन बोंड अळ्या, तुडतुडे पाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, फळमाश्या, भुंगेरे, खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो व त्यांचा बंदोबस्त होतो.

• निंबोळी अर्क घरी कसा तयार करण्यासाठी विविध पद्धती अवलंबल्या जातात.


• यातील प्रचलित पद्धत म्हणजे,

- कडुलिंबाच्या झाडाखालाल निंबोळ्या वेचून घेतल्या जातात.

- निंबोळी वरील साल काढून त्या उन्हात वाळवतात.

- अंदाजे ५० ते ६० ग्रॅम निंबोलीच्या वाळलेल्या बिया घेऊन त्याची बारीक पूड / पावडर तयार केली जाते.

- त्यानंतर ही पावडर/पूड एका कपड्यात बांधून ठेवली जाते. 

- नंतर हा पावडर बांधलेला कपडा एक लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवतात.

- यामुळे निंबोळीचा अर्क हा पाण्यात उतरतो.

आणि मग  हा अर्क विविध पिकांवर फवारणीसाठी वापरून विविध किडींचा बंदोबस्त केला जातो.


- निंबोळी अर्क हा आंतरप्रवाही असतो, त्यामुळे हा झाडाच्या सर्व भागांमध्ये पोहोचतो. 

- फवारणी ही संध्याकाळी केली तर अधिक फायदा होताना दिसून येतो.

• अंदाजे ५ लिटर निंबोळी अर्क १०० लिटर पाण्यात घ्यावा.

• या १०० लिटर पाण्यात अंदाजे गरजेनुसार १०० ग्रॅम अंघोळीचा किंवा कपड्याच्या साबणाचा चुरा टाकावा, किंवा याची पेस्ट तयार करून टाकावी.

नंतर हे मिश्रण चांगले ढवळून घेऊन फवारणीसाठी वापरावे.

• कमी खर्चातील, हानिकारक रसायनमुक्त, व प्रभावशाली हे औषध आहे. महाराष्ट्रातील बरेच शेतकरी या नैसर्गिक किटनाशकाचा वापर करत आहेत. 

• अश्या किटनाशकाचा वेळोवेळी वापर केल्याने,पिकांवर पडणारे विविध किडी आपण आटोक्यात आणू शकतो, तसेच शेतीवर होणार खर्च ही कमी करू शकतो.


धन्यवाद.


Team ThinkingMindRJ

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share

Thursday, September 3, 2020

शेवगा शेती आणि वेस्टडीकम्पोजर

 ● शेवगा शेती आणि वेस्टडीकम्पोजर ●

Waste Decomposer


वेस्टडीकम्पोजर शेवगा शेती मध्ये विविध प्रकारे वापरता येते.


वेस्टडीकम्पोजर कसे तयार करावे हे सर्वांना माहीत आहेच, आता शेवगा शेतीत हे द्रावण कसे व केव्हा वापरावे याबद्दल माहिती घेऊयात.


वेस्टडीकम्पोजर मध्ये डीकंपोजींग बॅक्टेरिया प्रचंड प्रमाणात असल्यामुळे हे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, व हे खूप स्वस्त देखील आहे.



ThinkingmindRJ



● शेवगा शेतीमध्ये याचा उपयोग प्रामुख्याने,


• बीजप्रक्रिया

• जमिनीतून देणे, व

• फवारणी करणे,

अश्या पद्धतीने होऊ शकतो.



● बीज प्रक्रियेसाठी.


• शेवगा बीज प्रक्रिया करताना, १ लिटर पाण्यात १०० मिली. हे प्रमाण घ्यावे.


• शेवगा बीज लागवडी अगोदर, किमान 8 तास बियाणे या मिश्रणात भिजवत ठेवावीत.


• तदनंतर या द्रावणातून बियाणे बाहेर काढून, सावलीमध्ये किमान अर्धा तास सुकवावे.


• नंतर टोकन पद्धतीने हे शेवगा बीज, लागवडीसाठी वापरावे.


• शेवगा बीज न लावता, जर रोपे लावणार असाल तर, शेवगा रोपे लावणी अगोदर, त्यांची मुळे वरील सांगितलेल्या द्रावणात बुडवून घ्यावे व मग खड्ड्यामध्ये रोपांची लागण करावी. 


• तसेच रोप लागवडीसाठी केलेल्या खड्ड्यामध्ये टाकलेल्या शेणखतावर फवारणी करू शकता, किंवा २०० मिली वेस्टडीकम्पोजर द्रावण खड्ड्यामध्ये टाकू शकता.


• या प्रक्रियेमुळे बियाणांवर असणारे हानिकारक बुरशी व विषाणू यांचा नाश होऊन होणारी संभावित हानी टाळता येते.


• शेवगा रोपांच्या मुळांना, सुरवातीला होणारी मूळकूज टाळता येऊ शकते.




● वेस्टडीकम्पोजर जमीनीतुन देणे.


• वेस्टडीकम्पोजर चे तयार झालेले २०० लिटर द्रावण, १ एकरास ठिबकद्वारे अथवा पाटपाण्याने द्यावे.


• वेस्टडीकम्पोजर मुळे जमीनीत सूक्ष्मजीवाणूची वाढ झपाट्याने होते.


• तसेच वेस्टडीकम्पोजरच्या नियमित वापराने गांडूळांची वाढ होऊन, जमिन सुपिक व भुसभुशित बनते. 


• नियमित वापराने जमीनीतील सेंद्रीय पदार्थांचे अतीशीघ्र विघटन होते व त्यांचे रूपांतर अन्नद्रव्यात होण्यास मदत होते. 


• ही विघटन झालेली अन्नद्रव्ये पिकाच्या मुळांना सहजा सहजी ग्रहण करता येतात.


• यामुळे झाडाची सर्वांगीण वाढ जोमाने होण्यास मदत होते.


• बहुतांश शेतकरी वेस्टडीकम्पोजर चे द्रावण दर १५ दिवसाला जमिनीतून देतात, अश्या ठिकाणी, अश्या जमिनीत गांढुळाचे अतिप्रमाण आढळून येत आहे, जेणेकरून नैसर्गिकरित्या गांढुळ खत तयार होते.



● वेस्टडीकम्पोजर फवारणी.


• शेवगा झाडावर फवारणीसाठी १ लिटर पाण्यात ३०० मिली. वेस्टडिकंपोजरचे द्रावण मिसळून चांगले ढवळून घ्यावे.


 • फवारणीसाठीच्या १५ लिटर क्षमतेच्या पंपात ४ ते ४.५ लिटर द्रावण मिसळावे लागेल.


• हे द्रावण, दर ८ ते १५ दिवसांनी फवारावे.


• या फवारणीमुळे हानीकरक बुरशी व कीड यांचा उपद्रव आटोक्यात येतो.


• पानांचा हिरवेपणा, फुलकाळींची संख्या वाढलेली निदर्शनात आलेली आहे.


• शेवगा झाडावर झालेल्या, प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार, वेस्टडिकंपोजरचे द्रावण इतर सेंद्रिय किटनाशक, उदा. निम तेल, निंबोळी अर्क, गोमूत्र इत्यादी सोबत फवारणीसाठी वापरता येते.



धन्यवाद.


Team ThinkingMindRJ.


शेवगा शेतीवरील Youtube channel -

 " Thinkingmindrj "

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w


Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share

Wednesday, September 2, 2020

शेवग्याचा पाला - जनावरांचा पौष्टिक आहार.

 ● शेवग्याचा पाला - जनावरांचा पौष्टिक आहार.●

Thinkingmindrj


शेवगा पाला


• शेवग्याच्या पूर्ण झाडामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे शेवग्याला परदेशात "Miracle Tree" म्हणून संबोधले जाते.

• शेवगा झाड सर्वांगाने उपयुक्त झाड आहे.

माणसाच्या आहारात शेवग्याला अति महत्व आहेच, तसेच जनावरांच्या आहारात देखील याचा अतिशय महत्व आहे.


• शेवग्याच्या पानात प्रथिने, जीवनसत्वे, खनिजं, संप्रेरके, तसेच इतर जीवनावश्यक घटके हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. 


• यामुळेच शेवगा पाल्याचे,जेवढे महत्व मानवाच्या आरोग्यात आहे, तेवढेच महत्व हे जनावरांच्या आरोग्यास ही उपयुक्त आहे. 

पण याचा प्रचार पाहिजे तसा आपल्याकडे झालेला दिसत नाही.


• शेवग्याच्या पाल्याचा प्रचार जनावरांच्या खाद्यासाठी व्हावा यासाठीच का लेख लिहीत आहे.


● शेवग्याच्या पानात महत्वाचे पोषण तत्वे खलील प्रमाणे असतात.


• प्रथिने- 23-25%,

• कॅल्शियम- 0.8%, 

• पोटॅशियम- 0.24% 

• फॉस्फरस- 0.30%, 

• तांबे- 8.78 पीपीएम, 

• मॅग्नेशियम- 0.5%,

• सोडियम- 0.20%,

• लोह- 470 पीपीएम,

• झिंक- 18 पीपीएम.



● शेवगा पानांची तोडणी :-


• चार्‍यासाठी पहिली तोडणी ही, 70 ते 90 दिवसांनी करावी. ( झाडाच्या सर्वांगीण वाढीवर अवलंबून)


• पहिल्या तोडणी नंतरच्या पानांच्या तोडण्या ह्या दार  45 ते 50 दिवसांच्या अंतराने घेता येतात.

• वर्षातुन साधारणतः 6 ते 8 तोडण्या घेता येतात.



● जनावरे हा चारा आवडीने खातात..


• कडब्याच्या कुटी सोबत शेवग्याचा पाला देता येतो. 


• पाने वाळवून देखील जनावरांच्या इतर खाद्यामध्ये मिसळून देता येते,यामुळे जनावरांच्या खुराकावर असलेला खर्च कमी होण्यास मदत होते. 


• वाळलेला शेवग्याचा पाला + मक्याचा भरडा + मीठ हे घटक 80:19:1 या प्रमाणात मिसळावेत व्यवस्थित मिसळण्यासाठी 4 ते 5 किलो मळी (मोलॅसिस) प्रती 100 किलो मिश्रणात काहीजण वापरतात.या मळी मुळे आहाराचा गोडवा वाढतो आणि शेळ्या मेंढ्यांकडून चारा जास्त प्रमाणात खाल्ला जातो.



● स्वस्त आणि पौष्टिक शेवग्याचा पाला.


• दुभत्या जनावरांत दुधाचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे.


• दुधाची प्रत देखील उंचावलेली दिसून आलेली आहे.


• कमी पाणी असलेल्या ठिकाणी सुद्धा वर्षभर हिरव्या चार्‍याची उपलब्धता राहू शकते.


• शेवग्याचे झाड चिवट असल्यामुळे मरीचे प्रमाण कमी असते.


• शेळ्या, मेंढया इत्यादी जनावरांत वजन वाढीसाठी उपयुक्त ठरतो.


• अर्ध्या एकरातही मुबलक प्रमाणात चारा उत्पादन होऊ शकते.


• या खाद्यामुळे जनावरांची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.




● शेवग्याच्या पानांचा चारा तयार करण्यासाठी खलील वाणांचा वापर करावा :- 

 PKM-1, PKM-2, ODC, ODC+, Kokan ruchira, Jafna इत्यादी.



धन्यवाद.


ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w


Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share

शेवगा आणि पाऊस

 नमस्कार मित्रांनो,


पावसाळा चालू आहे, महाराष्ट्रातील बऱ्याच भागात सतत धार पाऊस आहे, तसेच काही भागात आठवड्यातून 3 ते 4 वेळा पाऊस पडत आहे.

अश्या प्रकारचे पर्जन्यमान हे शेवगा पिकास मानवत नाही. 

Thinkingmind टीम नेहमी यावर मार्गदर्शन करत आहे की, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन शेवग्यास मानवते, लागवड करण्याअगोदर जमीनीचा व आपल्याकडील पर्जन्यमानाचा अंदाज घेणे गरजेचे असते.


जून,जुलै आणि ऑगस्ट मधील शेवगा लागवडीस या पावसाचा फटका बसलेला दिसत आहे..

झाडाची वाढ खुंटने, पानगळ, पाने पिवळी पडणे, मूळकूज होऊन रोप कोमेजून जाणे, रोप वाळणे, पूर्ण पानगळ होऊन फक्त काढ्या उभ्या राहणे इत्यादी...समस्या दिसून येत आहेत.


आपण मागील काही व्हिडीओ मध्ये सांगितलेले आहे की, आठवड्यातून एकदा तरी बुरशीनाशक व हुमिक ऍसिड ची आळवणी करावी किंवा ड्रीप द्वारे द्यावे.

फक्त एवढी उपाययोजना करून, आपण सध्या रोपे वाचविण्याचे ध्येय ठेवावे, असे मला वाटते.

अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही, ज्या रोपाच्या काड्या दिसत आहेत,त्याला पुन्हा हिरवी पालवी , फुटवे फुटणार आहेत. संयम ठवून काम करावे.


बुरशीनाशकामध्ये SAAF ही पावडर वापरण्याचा आपण सल्ला देतो,कारण यात दोन बुरशीनाशके आहेत, मुळांना झालेला बुरशीचा प्राथमिक व अति प्रमाणात झालेला प्रादुर्भाव यामुळे आटोक्यात येतो.

शेवगा शेती


संयम ठेवावा, पाऊस निवळून, ऊन पडल्यावर तुम्हाला नवीन फुटवे दिसतील, व उत्साह वाढेल यात शंका नाही.


बाकी शेवगा शेती संदर्भात सर्वतोपरी मदत करण्यास ThinkingMindRJ  टीम नेहमी तुमच्या सोबत आहेच.



धन्यवाद.🙏


Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share

शेवगा शेती नियोजन

 नमस्कार मित्रांनो, पाऊस उशिरा गेल्यामुळे शेवगा शेतीत फुलोरा व सेटिंग उशिरा होताना दिसत आहे. ज्या ठिकाणी मागील 1 महिन्यापासून पाऊस संपलेला आ...