● सेंद्रिय किटनाशक ●
पाने खाणारी, पाने गुंडाळणारी अळी, तसेच मावा यासाठी प्रभावी सेंद्रिय किटनाशक.
शेवग्यावर पडणाऱ्या महत्वाच्या अळ्या म्हणजे पाने गुंडाळणारी व पाने खाणारी अळी होय.
या अळीच्या नियंत्रणासाठी विविध रासायनिक किटनाशक बाजारात उपलब्ध आहेत. या रासायनिक किटनाशकाच्या वापरामुळे खर्चात वाढ होतेच तसेच बऱ्याचवेळा यांचे प्रमाण जास्त झाल्यास पानगळ देखील होताना दिसून येते. अश्यावेळी सेंद्रिय पद्धतीने, घरच्याघरी तयार केलेले किटनाशक हा एक प्रभावी पर्याय ठरु शकतो. यामुळे खर्च कमी होतो, व झाडास इजा होत नाही, मधमाशी दूर जात नाही असे अनेक फायदे होतात.
पाने खाणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी यांच्यावर वेळेतच नियंत्रण मिळविणे गरजेचे असते, करण यामुळे झाडाच्या सर्वांगीण वाढीवर परिणाम होऊ शकतो.
जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात त्यांना याची नक्कीच माहिती असेल, असे अनेक शेतकरी असतात जे सेंद्रिय व रासायनिक शेती म्हणजे मिश्र प्रकारची शेती करून वेळोवेळी शेतीत होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवतात. त्यांनी या किटनाशकाच्या शेतीत नक्कीच वापर करावा.
● या किटनाशकासाठी लागणारी सामग्री ●
• तंबाखू
• हिरवी मिरची
• लसूण
• निम अर्क
• गोमूत्र
• पाणी.
● वरील सामग्रीचे प्रमाण. ●
• तंबाखू - 250 ग्रॅम.
• हिरवी मिरची - 500 ग्रॅम.
• लसूण - 250 ग्रॅम.
• नीम अर्क - 200 मिली.
• गोमूत्र - 2 लिटर.
• पाणी - 2 लिटर.
● सेंद्रिय किटनाशक बनविण्याची प्रक्रिया ●
- प्रथम 2 लिटर पाणी आणि 2 लिटर गोमूत्र एकत्रित करून, चांगले ढवळून घ्यावे.
- त्यानंतर, हिरवी मिरची व लसूण हे बारीक ठेचून घ्यावे. वरवंट्यावर किंवा मिक्सर याचा वापर केला तरी चालेल.
- यानंतर वरील पाणी आणि गोमूत्राच्या 4 लिटर मिश्रणापैकी 3 लिटर पाणी-गोमूत्र मिश्रण घेऊन त्यात हिरवी मिरची व लसूण याची पेस्ट टाकावी व हे सर्व शेगडीवर किंवा चुलीवर 10 मिनिटे चांगले उकळून घ्यावे. मिरची आणि लसणाचा अर्क या पाणी+ गोमूत्रामध्ये चांगला उतरू द्यावा.
- यानंतर, उरलेले 1 लिटर, गोमूत्र+ पाणी मिश्रणात तंबाखू टाकून, हे मिश्रण देखील 10 मिनिटे चांगले उकळून घ्यावे.
- नंतर वरील दोन्ही मिश्रण थंड होऊ द्यावे. जेणेकरून यात टाकलेल्या घटकांचा चांगला अर्क उतरेल.
- वरील दोन्ही मिश्रण थंड झाल्यावर एकत्रित करून चांगले ढवळून घ्यावे.
- आता ह्या ढवळलेल्या मिश्रणात, 200 मिली. नीम अर्क टाकावे व पुन्हा हे सर्व मिश्रण चांगले ढवळून घ्यावे.
• वरील सर्व प्रक्रिया झाल्यावर आपले किटनाशक तयार होईल, हे अंदाजे 3 लिटर मिश्रण तयार होऊ शकते.
● सेंद्रिय किटनाशक वापरण्याची पद्धत ●
- वरील तयार केलेले सेंद्रिय किटनाशक हे फावरणीसाठीच वापरावे.
- सेंद्रिय किटनाशक 15 लिटरच्या टाकी साठी 150 मिली या प्रमाणात घ्यावे.
- याची फवारणी करताना तोंडाला रुमाल बांधावा, पूर्ण बाहीचा शर्ट घालावा, तसेच डोळ्यावर गॉगल लावावा.
- ही फवारणी शक्यतो संध्याकाळच्या वेळेस घ्यावी, जेणेकरून याचा चांगला परिणाम आपणास पहावयास मिळेल.
- शेवग्यामध्ये हे सेंद्रिय किटनाशक मावा, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, कोळी, लाल कोळी यावर प्रभावीपणे वापरता येते. तसेच अंडीनाशक म्हणून देखील या सेंद्रिय किटनाशकाच्या वापर करता येतो.
• हे किटनाशक तयार केल्यावर लागलीच वापरले असता उत्तम परिणाम दिसून येतो.
• शेतीवरील खर्च कमी होतो, रासायनिक किटनाशकामुळे होणारे दुष्परिणाम होत नाहीत. हे किटनाशक पूर्णतः सेंद्रिय असल्यामुळे याचे कसलेच साईड इफेक्ट शेवगा झाडावर होत नाहीत.
धन्यवाद.
Team ThinkingMindRJ.
YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w
Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share
खूप छान माहिती दिलीत सर
ReplyDelete